ऊस शेतीत ड्रोनद्वारे फवारणी: लोकरी मावा व पायरिला- पाकोळीसाठी; श्री. भास्कर काळे (अण्णा) यांचा प्रात्यक्षिक अनुभव
By- प्राजक्ता सिद्धांत तुपे (Prajakta Siddhant Tupe)
शेतकरी प्रात्यक्षिक : श्री. भास्कर सी. काळे (अण्णा), प्रगतिशील शेतकरी
आधुनिक कृषी तंत्रज्ञान व शेती अनुभव
प्रस्तावना
आधुनिक शेती तंत्रज्ञानाची कास धरण्यात श्री. भास्कर सी. काळे (अण्णा) हे नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. यापूर्वी त्यांनी सौर ऊर्जेवर चालणारा पंप, शेतीतील स्वयंचलन (Automation) आणि आधुनिक ठिबक सिंचन पद्धती आपल्या शेतात यशस्वीरीत्या राबविल्या आहेत. कमी वेळ, मजुरांची बचत आणि कामातील अचूकता साधण्याचा हा प्रयत्न त्यांनी यंदाही कायम ठेवला.
या वेळी त्यांनी उसाच्या पिकावर प्रादुर्भाव करणाऱ्या लोकरी मावा (Woolly Aphid) आणि पाकोळी (पायरिला - Pyrilla) या उपद्रवी किडींच्या प्रभावी नियंत्रणासाठी कृषी ड्रोनच्या (Agri-Drone) साहाय्याने फवारणीचा अभिनव प्रयोग केला. प्रस्तुत लेखात या प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाचा तपशील, त्यामागील तांत्रिक माहिती, फायदे आणि घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर आढावा घेतला आहे.
शेताच्या बांधावर ड्रोन ऑपरेटरसह फवारणीची पूर्वतयारी करताना श्री. भास्कर काळे (अण्णा).[ छायाचित्र : शेतात फवारणीसाठी सज्ज असलेला ड्रोन व श्री. भास्कर काळे ]

